स्व. डॉ. पतंगराव कदम साहेबांच्या स्मृतिस्थळाकडे जाणाऱ्या रस्त्याची धूळधाण

दत्ता पवार
स्व. डॉ. पतंगराव कदम यांच्याकडे ध्येयवादी माणूस म्हणून पाहिलं जायचं. समाजविकास आणि सामाजिक बांधिलकीचं अतूट नातं त्यांच्यात होतं. पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाला विकासात त्यांनी वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. रस्तेविकासात ते नेहमी सतर्क असायचे. आता साहेबांच्या स्मृतिस्थळाकडे जाणाऱ्या रस्त्याची धूळधाण उडाली आहे. कडेगाव तालुक्यातील सर्वाधिक व्यस्त असणारा रस्ता शेवटच्या घटका मोजत आहे.
डॉ. पतंगराव कदम साहेबांचं स्मृतिस्थळ सोनहिरा साखर कारखाना कार्यस्थळ परिसरात आहे. कदम साहेबांचं उत्तुंग कार्य आणि लोकांच्या श्रद्धेचं स्थान, यामुळं त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारी माणसं महाराष्ट्रभर आहेत. साहेबांच्या स्मृतिस्थळाला भेट देण्यासाठी लोकांची प्रचंड वर्दळ असते. ‘लोकतीर्थ’, असं या स्थळाला संबोधलं जातं. पण रस्त्याच्या दुरावस्थेमुळे साहेबप्रेमी लोकांना प्रचंड मनस्ताप होतोय.
कडेगाव-चिंचणी हा तालुक्यातील प्रमुख मार्ग. या रस्त्याने सागरेश्वर अभयारण्य, डोंगराई देवी, चौरंगीनाथ, आदी पर्यटनस्थळाकडे जाता येते. सोनहिरा साखर कारखाना याच मार्गावर येतो. पर्यटनस्थळे आणि साहेबांचं स्मृतिस्थळ यामुळं पर्यटकांची संख्या लक्षणीय असते. पण रस्त्याच्या समस्येमुळे लोकांना मनस्ताप सोसावा लागत आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना ‘खड्डा कोणता चुकवू’ असा अनुभव येतो. वाहनांचे आणि वाहन धारकांचे शरीर खिळखिळे होऊन जाते. बैलगाडीतून मोठ्या प्रमाणात ऊस वाहतूक सुरू आहे. खराब रस्त्यांमुळे मुक्या जनावरांचे हाल होत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कडेगाव तालुक्यात विकासकामांचा शुभारंभ करण्याचा धडाका सुरु आहे. काँग्रेस व भाजपचे नेते शुभारंभात व्यस्त आहेत.
राहुल गांधींचा या मार्गानं प्रवास
गत साली आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी राहुल गांधींच्या प्रमुख उपस्थितीत भला मोठा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याची देशभरात चर्चा झाली. राहुल गांधींच्या दौऱ्यामुळे या रस्त्याची डागडुजी केली. या मार्गाने त्यांनी वाहनातून प्रवास केला. नेत्यांच्या दौऱ्यात सतर्क असणारी यंत्रणा आता मात्र झोपली आहे.
साकडं कोणाला घालावं
सोनहिरा साखर कारखान्याचे गाळप सुरू आहे. ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची तोबा गर्दी आहे. ऊस वाहतुकीबरोबर अन्य वाहतूकही प्रचंड वाढली आहे. अपघाती रस्ता म्हणून हा रस्ता प्रसिध्द आहे. आता तर रस्त्याने चाळणीचे रूप धारण केले आहे. मोठाल्या खड्ड्यांमुळे वाहने आचके देत आहेत. राज्यात सत्ता भाजपची, लोकप्रतिनिधी काँग्रेसचा. रस्ता दुरुस्त व्हावा, म्हणून कोणाला साकडं घालावं, ते सांगावं आणि यातून सुटका करावी. एव्हढंच लोकांकडे बाकी आहे.




