स्व. डॉ. पतंगराव कदम साहेबांच्या स्मृतीस्थळाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ‘मी’ सज्ज !

दत्ता पवार
स्व. डॉ. पतंगराव कदम साहेबांच नाव समोर येताच, त्यांचं अथांग कार्य डोळ्यापुढं उभं राहतं. यामुळंच त्यांच्या पश्चातही त्यांच्यावर प्रेम करणारी लाखों लोकं आहेत. याची प्रचिती त्यांच्या स्मृतिस्थळावर पहायला मिळते. स्मृतिस्थळाला भेट देण्यासाठी देशभरातून साहेब प्रेमी येतात. पण त्यांना खराब रस्त्याचा सामना करावा लागतो. स्मृतिस्थळाकडे जाण्यासाठी कडेगाव रस्ता सोयीचा आहे.
कडेगाव तालुक्यातील हा सर्वाधिक रहदारीचा. पर्यटनस्थळाकडे सोयीचा. सोनहिरा साखर कारखान्याकडे जाणारा. तालुक्याच्या विकासात मोठं योगदान देणारा. पण हा रस्ता शेवटचा श्वास घेत आहे. प्रगतशील विकासातल्या मतदारसंघातील हा मार्ग दीन अवस्थेत का ? असा प्रश्न पडेल. पण याचं उत्तर हो असंच येईल.
कडेगाव-चिंचणी रस्ता भयानक यातना भोगत आहे. रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. प्रमुख रस्ता असल्याने वाहतूक प्रचंड आहे. ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. बैलगाडीतून ऊस वाहतूक सुरू आहे. सामान्यजनांबरोबर मुक्या प्राण्यांची दमछाक होत आहे. बरं हे जबाबदार मंडळी उघड्या डोळ्यांनी पहात आहेत. मग गप्प का? असाही प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
रस्ता भीषण दुरावस्थेतून मार्गक्रमण करीत आहे. संबंधित विभागाची याबाबत झोप गेली नाही. मागील दोन महिन्यांपासून खड्डे बुजविण्यासाठी संथगतीने साहित्य टाकले जात आहे. रस्त्याच्या दुतर्फा साहित्य धूळ खात पडले आहे. डांबर यंत्र रस्त्याच्या कडेला इतमामात उभे आहे. आपल्या धगीने डांबर वितळणारे डांबर यंत्र कडाक्याच्या थंडीने गारठून गेले आहे. संबंधित विभागाने नेमलेला ठेकेदार परागंदा झालेला आहे. डांबर यंत्र सामुग्रीसह सज्ज आहे. पण कामदार गायब आहे. म्हणून डांबर यंत्राला मोठ्या खेदानं म्हणावं लागतंय, मी “सज्ज” आहे. ! याला शोकांतिकाच म्हणावं लागेल.
