# चेहरा जिंकला ! – सह्याद्री दर्पण
राजकीय

चेहरा जिंकला !

दत्ता पवार
मनुष्य जीवनात आणि जडणघडणीत चेहरा महत्वाचा ठरतो. चेहऱ्यावरच पारख केली जाते. ही पारख कडेगाव तालुक्यातील हिंगणगाव बुद्रुक भागातील लोकांनी केली. आणि मोहर उमठविली. हा चेहरा मोठा वारसा सांगणारा. विरासत मोठी पण या चेहऱ्याचं वलय आणि करिश्मा. हा चेहरा कोणाचा, चेहऱ्याला ग्रामीण जनतेनं डोक्यावर का घेतलं ? याचा उलगडा पुढं करूया…

डॉ. जितेश कदम या चेहऱ्यावर आजचं भाष्य. या चेहऱ्यानं “सह्याद्री दर्पण”ला भाष्य करायला भाग पाडलं. निमित्त ठरली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक. कडेगाव तालुका आणि स्व. डॉ. पतंगराव कदम यांचं उभ्या राज्यात समीकरण. आज आपण बात करत आहोत तो चेहरा कदम साहेबांचा व वनश्री माजी आमदार मोहनराव कदम यांच्या नातवाचा. मोहनराव कदम दादांच्या तालमीत तयार झालेला हा चेहरा आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढं जात आहे.

डॉ. जितेश कदम यांचं एव्हढं कौतुक का? हा प्रश्न सतावेल. अपयशावर टीकेचे बाण सोडले जातात तर मग यशाचं कौतुक झालं तर नवल काय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या, निकाल लागला. याच निकालानं जितेश कदम भलतेच चर्चेत आले. कडेपूर जिल्हा परिषद अंतर्गत हिंगणगाव बुद्रुक पंचायत समिती गण येतो. या गटावर भाजपचा पर्यायानं देशमुख कुटुंबाचा कब्जा. असं असताना डॉ. जितेश कदम यांनी उमेदवारी केली. त्यांची उमेदवारी अनेकांना बुचकळ्यात टाकणारी होती.

जितेश कदमांनी उमेदवारी केली खरी पण भाजपचा बाजूबंद गड भेदणार का? हा ऐरणीवरचा विषय होता. समोर माजी उपसभापती पद भूषविलेला भाजपचा तगडा उमेदवार. मग तर टक्कर भली मोठी होणार होती. पण त्यांनी गड भेदायचाच ठरवलं आणि हिंगणगावात मुक्काम ठोकला. कार्यकर्ते कामाला लागले. चुलते आमदार डॉ. विश्वजीत कदम आणि शांताराम बापू कदम यांचं भक्कम पाठबळ मिळालं. सांगली जिल्ह्याचं लक्ष या गणावर खिळलं.

जितेश कदम यांना ही निवडणूक सोपी नव्हती. पण यश पदरात पाडायचं हा त्यांनी चंग बांधला. या गणात येणाऱ्या प्रत्येक घरात त्यांनी भेट दिली. त्यांना या निवडणुकीत त्यांनी राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे युवकांचं संघटन कामी आलं. कडेगाव तालुक्यात याच गणाची हवा आणि चर्चा झडत होती. त्यांनी विनम्रतेनं केलेला प्रचार त्यांना भलंमोठं यश देऊन गेला. त्यांच्या या यशानं कडेपूर जिल्हा परिषद गट काँग्रेसच्या ताब्यात आला. काँग्रेस पक्षाची ही या निवडणुकीतील मोठी कमाई ठरली. राजकारणात केवळ सत्ता, विकास आणि आर्थिक गणित असून चालत नाही, तर चेहरा महत्वपूर्ण ठरतो, हे डॉ. जितेश कदम यांच्या घवघवीत यशानं दाखवून दिलं.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!