मालमत्ता कर; मुख्याधिकारी करणार खुलासा : ‘सह्याद्री दर्पण’ इफेक्ट

दत्ता पवार
कर भरणं नागरिकांची जबाबदारी. पण तोच कर वारेमाप असंल तर उद्रेक होणारच. याच उद्रेकाला हवा देण्याचं काम, दस्तुरखुद्द कडेगाव नगरपंचायतीच्या प्रशासनाने केलं. यावर “सह्याद्री दर्पण”ने नागरिकांचा आवाज बुलंद केला. आणि नगरपंचायत प्रशासनाला नमतं घ्यावं लागलं. अखेर मुख्याधिकारी डॉ. पवन म्हेत्रे यांनी यावर लवकरच खुलासा करू, असे आश्वासन “सह्याद्री दर्पण” शी बोलताना दिलं.
शासन निर्देशानुसार कडेगाव नगरपंचायत हद्दीतील मालमत्ता कर रचनेचा सर्व्हे पार पडला. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने सर्व्हेचे काम पार पडले. हा सर्व्हे पारदर्शक झाला. यामुळं यापूर्वी मालमत्तेची कमी नोंद केली त्यांचं पितळ उघडं पडलं. हे खरं असलं तरी या सर्व्हेने लोकांची धाकधूक वाढविली होती. आणि ती खरी ठरली.
भरमसाठ आकारणीची नोटीस नागरिकांच्या हातात पडताच कडेगावात हरघर संताप उडाला. वास्तविक कर भरणं हा भाग जरी खरा असला तरी सुविधाही देणं गरजेचं आहे. शहरात अनेक सुविधा देणं बाकी आहे. असं असताना कराचा कागद लोकांच्या हाती पडताच तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या.
मालमत्ता कर आकारणीवर नागरिकांचा आवाज बनत “सह्याद्री दर्पण” मैदानात आले. रोखठोक भूमिका मांडत नागरिकांची भूमिका विषद केली. सह्याद्री दर्पणच्या सडेतोड मांडणीची दाखल नगरपंचायत प्रशासनाला घ्यावी लागली. मुख्याधिकारी डॉ. पवन म्हेत्रे यांनी आज सह्याद्री दर्पणशी बातचीत केली. आणि खुलासेवार खुलासा करण्याचे आश्वासन दिले. त्यांचा खुलासा प्रस्तावित कर मूल्यांकन नोटिशीच्या बाजूनेच असणार, हे नक्की. पण भरघोस मालमत्ता कर आकारणीत कपात झालीच पाहिजे, या भूमिकेत नागरिक आहेत.
