अखेर स्व. डॉ. पतंगराव कदम साहेबांच्या स्मृतीस्थळाकडे जाणाऱ्या रस्त्याचे दुरुस्तीकरण : ‘सह्याद्री दर्पण’ चा पाठपुरावा

सह्याद्री दर्पण
विकास पुरुष म्हणून स्व. डॉ. पतंगराव कदम साहेबांचा आवर्जून उल्लेख करावा लागतो. पण त्यांच्या स्मारकाकडे जाणाऱ्या रस्त्याची धूळधाण उडाली होती. यावर “सह्याद्री दर्पण”ने रोखठोक भूमिका मांडली. अखेर सह्याद्री दर्पणच्या वृत्ताची दखल घेत रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले.
कडेगाव तालुक्यातील सर्वाधिक रहदारीचा रस्ता आहे. या मार्गावरून सागरेश्वर अभयारण्य, चौरंगीनाथ, डोंगराई देवी, ही पर्यटन स्थळे आहेत. सोनहिरा साखर कारखाना यामुळं हा रस्ता प्रचंड वाहतुकीनं गजबजलेला असतो. कदम साहेबांचे स्मारक झाल्यापासून यात कमालीची वाढ झाली आहे. साखर कारखाना सुरू झाल्याने ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची रहदारी वाढली आहे.
कडेगावहून सांगली, कोल्हापूरकडे जाण्यासाठी हा मार्ग सुकर आहे. इतका महत्वाचा रस्ता असताना संबंधित विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष झाले. तालुक्यात भरभक्कम राजकीय नेतेमंडळी आहेत. पण त्यांनीही याकडे फारसे गांभीर्याने पाहिले नाही. नागरिकांचा आवाज संबंधितांपर्यंत पोहचला नाही. यावर “सह्याद्री दर्पण”ने सडेतोड भूमिका मांडली. मग गेंड्याची कातडी पांघरलेल्या विभागाला जाग आली. आता रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. पण वादळी पावसाने रोडा घातला आहे. आज रस्ता दुरुस्त करण्यात आलेल्या भागात पावसाने हजेरी लावली. ग्रामीण भागात एक म्हण रूढ आहे.’ नकटीच्या लग्नाला सतरा विघ्न” बांधकाम विभागाच्या या कारभाराला काय म्हणावं ? यापुढं शब्द सुद्धा थिटे पडतील.
