नव्वदीपार शेलारमामा सार्वजनिक जीवनात व्यस्त : तरुणांना लाजविणारी ऊर्जा !

दत्ता पवार
शेलारमामा म्हटलं की, आपल्यासमोर उभा राहतो, तो हिंदवी स्वराज्याचा इतिहास. इतिहासात शेलारमामानं सुवर्णाक्षरानं नाव कोरलं. आज आपण पाहणार आहोत सार्वजनिक क्षेत्रातील शेलारमामा. हे शेलारमामा कोण? कुठलं, अशा प्रश्नांची सरबत्ती होणं स्वाभाविक. त्यांचं नाव मोहनराव कदम (शेठ).
मोहनराव कदम यांच नाव सांगली जिल्ह्यातील घराघरात पोहोचलंय, ते त्यांच्या कार्यकर्तृत्वाने. निस्पृह, निगर्वी, निरागस, असं त्यांच्या व्यक्तिमत्वाचं वर्णन करावं लागेल. सामजिक कार्याचं मापदंड ठरवायचं असेल तर माजी आमदार मोहनराव कदम यांच्याकडे पाहावं लागेल. मोहनशेठ नावानं त्यांना उभा सांगली जिल्हा ओळखतो. स्व. डॉ. पतंगराव कदम यांना घडविण्यात त्यांचं योगदान अतुल्य आहे. त्यांना आदरानं दादा म्हटलं जातं. हेच दादा नव्वदीपार झालेत पण त्यांचा पाय घरात ठरना.
दुर्दम्य इच्छाशक्ती आणि प्रबळ आत्मबल काय असतं याचं जितजागतं उदाहरण म्हणून मोहनराव कदम दादांच्याकडं पाहावंच लागतं. त्यांनी उभी हयात सामान्य, दीन -दलित, शेतकरी आणि कष्टकरी लोकांसाठी वेचलं. सांगली जिल्ह्यातील गावागावात-वस्तीवस्तीवर पोहचणारा जिल्ह्यातील एकमेव नेता. काँग्रेस पक्षाचा पाईक ते समाजसेवक ही बिरुदावली त्यांची पाठ सोडत नाही.
राजकारणातील तीन पिढ्यांसोबत काम
सांगली जिल्ह्याचं भूषण म्हणून वसंतदादा पाटील यांच्याकडे पाहिलं जातं. वसंतदादांचा प्रभाव मोहनराव दादांवर आहे. मोहनराव कदम यांनी वसंतदादा पाटील, प्रकाशबापू पाटील, प्रतीक पाटील आणि विशाल पाटील या तीन पिढ्यांसोबत काम केलं आहे. राजकारणातील जुनी – जाणती मंडळी आज हयात नाहीत. पण त्यांची उणीव मोहनराव कदम दादा भासू देत नाहीत.
मोहनराव कदम दादांचे सर्वपक्षीय संबंध सलोख्याचे आणि जिव्हाळ्याचे. दादांच्या राजकीय जीवनात विरोधकांकडून एकदाही जाहीर टीका झाली नाही. यावरूनच त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू कळून येतात. नव्वदीपार झालेले दादा घरात बसतील ते कसले. वयोमानानुसार होणाऱ्या व्याधी आणि आजारपण त्यांना मज्जाव करू शकत नाहीत. अनेकदा त्यांनी जीवघेण्या आजारावर मात केली. डॉ. पतंगराव कदम साहेबांचं दुःख गिळलं. पण समाजसेवेचा वसा पडू दिला नाही. या वयात त्यांच्यावर मर्यादा आल्यात. पण त्यांचा जीव जनतेच्या भल्याचा. कदम कुटुंबाचा वारसा पुतणे आमदार डॉ. विश्वजीत कदम पुढं नेत आहेत. पुत्र शांताराम कदम बापू त्यांना साथ देत आहेत. ऊर्जा आणि उर्जेचा अखंड स्रोत दादांच्या नसानसांत भिनलेला उतरत्या वयातही पाहायला मिळतो. युवापिढी त्यांना आमचा शेलारमामा संबोधते. त्यांचं व्यस्त कार्य नव्या पिढीपुढं आदर्शच, एव्हढं मात्र नक्की !