# विश्वजीत कदमांकडून यशाचं शिखर सर! – सह्याद्री दर्पण
महाराष्ट्र

विश्वजीत कदमांकडून यशाचं शिखर सर!

दत्ता पवार
आमदार डॉ. विश्वजीत कदम आणि यश हातात हात घालून चालत आहे. स्व. डॉ. पतंगराव कदम यांच्या पश्चात त्यांच्या यशाची पताका भरारी घेत आहे. काँग्रेस पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पलूस – कडेगाव विधानसभा मतदारसंघात अभूतपूर्व यश मिळालं. दोन्ही तालुक्यात एकतर्फी विजय आमदार साहेबांच्या कार्याची पोहोच पावती देऊन गेली. त्यांच्या राजकीय जीवनातील हे यश यशाचं शिखर ठरलं.

पलूस – कडेगाव विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा पर्यायाने डॉ. पतंगराव कदम साहेबांचा बालेकिल्ला. कदम साहेबांच्या माघारी या मतदारसंघाचं कसं, असं प्रश्नांकित नजरेनं पाहिलं जात होतं. कदम साहेबांचा भला मोठा वारसा डॉ. विश्वजीत कदम यांना पेलणार का? हा प्रश्न विश्लेषक उपस्थित करत होते. पण या चर्चा निरर्थक ठरवत डॉ. विश्वजीत कदम यांचं मार्गक्रमण सुरु राहिलं. विधानसभा निवडणुकीत त्यांच्या विजयाचं मताधिक्य घटलं. यामुळं उलट सुलट चर्चा सुरु झाल्या. हे शल्य त्यांनाही होतं. या शल्याचं उट्ट काढण्याची नामी संधी त्यांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत चालून आली. आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी विधानसभा निवडणुकीपेक्षा ही निवडणूक प्रतिष्ठेची केली. निवडणुकीत कोणतीही कसर न ठेवता प्रचार केला आणि यश मिळवलं. नुसतं यश मिळवलं नाही तर छप्पर फाडके यश मिळवून दिलं.

कदम साहेबांच्या हयातीतील शेवटच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत साहेबांना पराभव पाहावा लागला. मागील निवडणुकीत पलूस आणि कडेगाव तालुक्यात सत्ता भाजपच्या हातात गेली. ही सल, शल्य आमदार डॉ. विश्वजीत कदम यांना बोचत राहिली. यामुळं त्यांनी निष्ठेनं, त्वेषानं आणि आक्रमक रणनीती अवलंबली. यात त्यांना मतदारांनी साथ दिली. ही साथ त्यांना विक्रमी विजयापर्यंत घेऊन गेली. विरोधी भाजपचा मोठा पराभव झाला. कडेगाव व पलूस पंचायत समितीवर काँग्रेसचा झेंडा रोवला. जि. प. गटात निर्विवाद यश मिळवलं. हे यश अभूतपूर्व असं आहे. देशात राज्यात काँग्रेसची हाराकिरी होत असताना डॉ. विश्वजीत कदम यांनी आपला किल्ला भक्कम केला. या एकतर्फी विजयाने त्यांचं मतदारसंघातलं पर्यायानं काँग्रेस पक्षातलं स्थान खूपच मजबूत झालं.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!