मालमत्ता कर : कडेगावात नागरिक आंदोलनाच्या तयारीत

सह्याद्री दर्पण
कडेगाव नगरपंचायतीच्या प्रशासनाकडून मालमत्ता कर रचनेचा सर्व्हे झाला. प्रस्तावित कर मूल्यांकनाच्या नोटिसा घरपोहोच झाल्या. कर रचनेत अधिकचा भार नागरिकांवर पडणार आहे. याविरोधात नागरिक संतप्त झाले आहेत. आता ते आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.
शासन धोरणानुसार मालमत्ता तपासणी हाती घेण्यात आली. शासनाने नेमून दिलेल्या संस्थेने हे काम पार पाडले. याकामी नागरिकांनी सहकार्य केले. पण प्रस्तावित कर मूल्यांकनाची नोटीस हातात पडताच नागरिकांचा संताप अनावर झाला. भरमसाठ आकारणी असल्याने लोकांचा संयम सुटला आहे. वास्तविक कडेगावातील मूलभूत प्रश्न बाकी आहेत. क्षमतेने विकास लोकांपर्यंत पोहोचला नाही. शासनस्तरावर निधीसाठी नगरपंचायतीला झगडावे लागत आहे. यामुळे इच्छा असूनही नगरपंचायत कारभाऱ्यांना विकासकामात मोडतं घ्यावं लागत आहे. वीज, पाणी, आरोग्य आणि स्वच्छता शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचत नाही. अशातच मालमत्ता कर लादल्याची भावना निर्माण झाली आहे.
कडेगाव शहर झपाट्याने शहरीकरणाकडे झेप घेत आहे. लोकांनी कडेगावला पसंती दिली आहे. व्यावसायिक कडेगावच्या बाजारपेठेकडे आकृष्ट होत आहेत. पण प्रस्तावित कर व्यावसायिकांचे कंबरडे मोडणार आहे. घराघरात, चौका-चौकात आणि सोशल मीडियावर याची चर्चा जोरात सुरू आहे. नागरिक याविरोधात तीव्र आंदोलन छेडणार आहेत. पक्षीय राजकारणापलीकडचा हा विषय असल्याने पक्षभेद विसरून याबाबत भूमिका घेण्याची मागणी होत आहे.
“सह्याद्री दर्पण“चे अभिनंदन
सामाजिक प्रश्नावर ‘सह्याद्री दर्पण’ नेहमी सडेतोड भूमिका मांडत आहे. याच न्यायानुसार हा प्रश्न हाती घेतला. आणि रोखठोक भूमिका मांडली. नागरिकांचा आवाज बनण्याचं काम ‘सह्याद्री दर्पण’ने केले. याबद्दल सोशल मीडिया, भ्रमणध्वनी आणि प्रत्यक्षात भेटून नागरिकांनी ‘सह्याद्री दर्पण’चे अभिनंदन केले.
