कडेगाव तालुक्यात मटक्याची उलाढाल ;ऑल टाईम हाय

दत्ता पवार
शेअर बाजारात ‘ऑल टाईम हाय’ म्हणण्याची पद्धत रूढ झाली आहे. मग मटक्याच्या धंद्यात हे कसं? असं वाटण्यावाचून राहील कसं. बाजार कोणताही असो, जिथं पैसा, तिथं ही पद्धत येणं नित्याचंच. वाचायला, समजून घ्यायला जड जात असलं तरी याकडं वेगळ्या ‘अँगल’नं पाहावं लागेल. मटक्याची उलाढाल सर्वोच्च पातळीवर पोहोचणं, मग बातमी तर होणारच.
जगभराला बेरोजगारीनं ग्रासलं आहे. यामुळं शेअर बाजारात नशीब आणण्यासाठी मोठ्या संख्येने लोकं उतरली आहेत. यात तरुण पिढी अग्रेसर आहे. शेअर बाजाराला मान्यता आहे. मटका बाजाराला मान्यता कुठंय. तरीपण मटका बाजार रोज चढत्या क्रमाने वर सरकत आहे. यात ग्रामीण भाग पुढं आहे. ग्रामीण भागातील लोकं शेअर बाजारात जात नाहीत. त्याला जुगार मानतात. पण कायद्याच्या कसोटीवर जुगार असणाऱ्या मटक्यात खुलेआम नशीब अजमवताना दिसतात.
मटका ही सामाजिक कीड. याच किडीनं करोडो संसार पोखरून काढले आहेत. यात ग्रामीण, दुष्काळी भाग वरच्या क्रांमांकवर आहे. कडेगाव तालुका दुष्काळी टापूतला. आता दुष्काळ हटला असला तरी हे हटणं मटक्याला वरदान ठरलंय. दुष्काळी भाग पूर्वीपासून मटक्याच्या आहारी गेलाय. आता सुकाळात याची व्याप्ती वाढलीय. ती इतकी की, मागील रेकॉर्ड तोडत मटक्याची उलाढाल सर्वोच्च पातळीवर जाऊन पोहचली.
मटका बाजाराला कायदेशीर अधिष्ठान नसताना मटका धडधडीत सुरू आहे. खालपासून वरपर्यंत मटक्याचा मलिदा पोहचतोय. यावर अंकुश आणणाऱ्यांचे हात बरबटलेले आहेत. पण सामान्य कुटुंबाची वाताहत झाली आहे. मटका घेणारे आणि संरक्षण देणारे गब्बर झाले. खेळणारे भिकारी झाले. मंदीच्या काळातही मटका फुल्ल चालतो. शेअर बाजार, फॉरेक्स बाजार, उतरत्या क्रमावरून वाटचाल करीत आहे. पण कडेगाव तालुक्यातील मटका तेजी पकडून आहे.



