आमदार साहेबांना कोंडाळ्यानं घेरलंय !

दत्ता पवार
सत्ताकेंद्र कोणतंही असो, तिथं कोंडाळं हमखास असतं. सत्ता केंद्रावर यांचं कमालीचं वर्चस्व असतं. कोंडाळं शब्द अस्सल ग्रामीण ढंगाचा असला तरी शब्दाला गुंफणाऱ्यांचा वकूब दांडगा. याच दांडगाव्यात आमदार साहेब पुरं गुंतून गेलं आहेत. बरं ते आमदार साहेब कोण? त्यांचं घेरणं कसं काय? असे सवाल उभा राहणं क्रमप्राप्तच. ते आमदार कोण ? त्यांना घेरणारं कोण ? याचा तपशीलवार हिशोब मांडूया.
महाराष्ट्राच्या राजकारणात जाज्वल्य प्रस्थापित करणाऱ्या मतदारसंघाबद्दल बात करणार आहोत. पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघ असं नाव. या मतदारसंघाची हवा उभ्या महाराष्ट्रानं अनुभवली आहे. या मतदारसंघात द्रष्टा नेता होऊन गेला, त्यांचं नाव डॉ. पतंगराव कदम. कदम साहेबांचे कार्य, कर्तृत्व आणि धमक याची नव्यानं मांडणी करणं गरज नाही. त्यांचं कर्तृत्व सातासमुद्रापार गेलंय. त्यांच्या पश्चात ही जबाबदारी आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्यावर आली आहे. कदम साहेबांच्या निधनानंतर या मतदारसंघातील मतदारांनी विश्वजीत कदम यांच्यावर विश्वास दाखवला आहे.
स्व. डॉ. पतंगराव कदम साहेब आणि आमदार विश्वजीत कदम यांच्या कार्यपद्धतीत मोठा फरक आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीतील हा फरक असला तरी कदम साहेबांच्या कार्याची अनुभूती घेणाऱ्या लोकांना हल्लीचं पचनी पडेना. कदम साहेबांची नाळ शेवटच्या स्तरापर्यंत होती. त्यांच्यापर्यंत लोकं हक्कानं जात होती. त्याही काळात साहेबांच्या भोवती कोंडाळं होतं. पण सामान्य लोकांना साहेबांपर्यंत जाता येत होतं. आता सामान्य लोकांना आमदार साहेबांपुढं गाऱ्हाणं मांडायचं असतं, पण कोंडाळकरांची अभेद्य तटबंदी भेदता येत नाही. कोंडाळ्याच्या वेढ्यातील आमदार अशी ओळख, डॉ. विश्वजीत कदम यांची गडद झाली आहे.
आमदार साहेबांची चिठ्ठी भेट !
आमदार डॉ. विश्वजीत कदम भागात आल्यानंतर त्यांची भेट घडावी म्हणून महिनोंमहिने वाट पाहणारा सामान्यजन, भेट घडावी म्हणून आसुसलेला असतो. बाळासाहेब भागात कधी येणार, याची विचारपूस करून दमछाक झालेला मतदार भेटीला येतो. आपलं काम होणार, अशी भाबडी आशा ठेवून. लोकं भल्या पहाटे असो वा उशिरा रात्री आमदार साहेब आपल्याला भेटणारच, अशी खात्री बाळगून येतात. त्यांची पहिली मुलाखत आमदार साहेबांच्या प्रशासनाशी होते. प्रशासनातील मंडळी आदबीनं विचारपूस करतात. या पाहुणचारामुळे लोकं भलतीच खुश होतात. उपस्थित लोकांच्या नावांची चिठ्ठी आमदार साहेबांच्या भेटीस्थळी पोहचते. प्रत्यक्षात मात्र भेटीत नेहमीचे कार्यकर्ते पुढं असतात. लोकं विचार करतात आम्ही तर पहिलं आलोय, मग आमची चिठ्ठी कुठं गेली ? चिठ्ठी भेटीच्या लकी ड्रॉत कोंडाळकरांचा नंबर लागतो. पदरी निराशा घेऊन सामान्य माणूस नशिबाला दोष देत, तिखट प्रतिक्रिया देत परतीच्या प्रवासाला लागतो. आमदार साहेबही पुढच्या गावाला निघून जातात. पण प्रश्न उरतो तो इमानेइतबारे राबणाऱ्या निष्ठा ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांचा, सामान्य लोकांचा.